संजय पाटील -- कऱ्हाड -‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे,’ असं म्हणतात; पण मरणानंतर अवयवरूपी उरण्याचा संकल्प कऱ्हाडातील अल्वारीस कुटुंबीयांनी केला आहे. आजी, आई, वडिलांसह मुलानेही देहदान करण्याचा निर्णय घेतला असून, आजीच्या देहदानाची कागदोपत्री कार्यवाहीसुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. देह नश्वर असला तरी टाकाऊ नाहीच, असं या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. स्टिव्हन अल्वारीस हे कऱ्हाडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. गडहिंग्लज हे अल्वारीस कुटुंवीयांचं मूळ गावं. स्टिव्हन यांची कऱ्हाडला बदली झाल्यानंतर हे कुटुंंब येथेच विद्यानगरमध्ये स्थायिक झाले. स्टिव्हन यांचे वडील थॉमस यांनी देहदानाचा संकल्प केलेला. मात्र, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आजारामुळे ते या संकल्पापासून दुरावले. त्यांची देहदानाची इच्छा अपुरी राहिली. त्यामुळे स्टिव्हन यांची आई सुशीला यांनी देहदानाचा संकल्प केला. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांनी याबाबत कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनीही त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर सुशीला यांच्या देहदानाच्या संकल्पानंतर स्टिव्हन, त्यांच्या पत्नी जेसिका व मुलगा सिल्वेस्टर यांनीही देहदानाची इच्छा बोलून दाखवली. काही महिन्यांपूर्वी सुशीला यांच्यासह अल्वारीस कुटुंबीय कृष्णा रुग्णालयात पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी सुशीला यांच्या देहदानाची कागदोपत्री सर्व कार्यवाही पूर्ण केली. यथावकाश स्टिव्हन, त्यांच्या पत्नी जेसिका व मुलगा सिल्वेस्टर यांच्या देहदानाचीही कागदोपत्री कार्यवाही करण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेतला आहे. त्याबाबत त्यांनी कृष्णा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. अल्वारीस कुटुंबीयांचा हा संकल्प आदर्शवत असाच आहे. त्या जाणिवेने कुटुंब सुखावलेफक्त अवयव निकामी झाल्याने अनेकजण जिवंतपणी मरणयातना भोगतात; पण मृत्यूनंतर आपले अवयव इतरांना उपयोगी पडतील आणि त्यातून किमान काहीजणांचे आयुष्य सुखकर होईल, या जाणिवेने सध्या अल्वारीस कुटुंबीय सुखावले आहे. देह कशासाठी संपवायचा?जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जो देह जपतो, सजवतो त्याच देहावर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार होतात. देह संपतो; पण न पाहिलेल्या गोष्टींसाठी देह संपविण्याची खरंच गरज आहे का, असा अल्वारीस कुटुंबीयांचा प्रश्न आहे. कृतीतून त्यांनी या प्रश्नाचे उत्तरही शोधले आहे.जगावं कसं शिकवलं, आता...सुशीला या प्राचार्या होत्या. पंधरा वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना जगावंं कसं, हे शिकवलं. आता मृत्यूनंतरही उरावं कसं, हे त्या कृतीतून शिकवतायत. जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नसला तरी या दोन्हीमधील अंतर म्हणजेच आयुष्य आपल्याच हाती आहे, असं सुशीला अल्वारीस सांगतात.
एकाच कुटुंबातील चौघांचा देहदान संकल्प!
By admin | Updated: April 17, 2016 23:28 IST