पालिकेकडून डागडुजी
सातारा : शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण केल्यानंतर सातारा पालिकेकडून अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. खडी व मुरुम टाकून अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जात असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. समर्थ मंदिर परिसर, चांदणी चौक ते बोगदा, शाहू चौक ते समर्थ मंदिर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे चुकविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महाबळेश्वरचा पारा
पोहोचला १४ अंशांवर
महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे तापमानही वाढू लागले असून, नागरिकांना उन्हाची झळ सहन करावी लागत आहे. हवामान विभागाने सोमवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान ३१.७ तर किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. तापमान वाढू लागल्याने पर्यटकांमधून शीतपेयांना मागणी वाढली आहे. उन्हामुळे दुपारच्या सुमारास येथील मुख्य बाजारपेठ, ब्रिटिशकालीन पॉईंट तसेच वेण्णा जलाशयाकडे पर्यटक पाठ फिरवित आहेत.
पर्यटकांमधून वाढली
स्ट्रॉबेरीला मागणी
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या स्ट्रॉबेरी या फळाला पर्यटकांमधून मागणी वाढू लागली आहे. यंदा परतीच्या पावसाचा या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र घटले. नुकसानीतून उभारी घेत शेतकऱ्यांनी पुन्हा स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली अन् ही फळे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली. प्रारंभी स्ट्रॉबेरीचे दर प्रतिकिलो पाचशे ते सहाशे रुपये होते. हे दर आता दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.