मिरगाव, आंबेघर, हुंबराळेचे पुनर्वसन जलसंपदा विभाग वसाहतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:30+5:302021-07-28T04:41:30+5:30
सातारा : ‘कोयना धरणाच्या पट्ट्यातील दरडग्रस्त मिरगाव, आंबेघर, हुंबराळे गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करावे,’ अशी सूचना ...
सातारा : ‘कोयना धरणाच्या पट्ट्यातील दरडग्रस्त मिरगाव, आंबेघर, हुंबराळे गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करावे,’ अशी सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला केली; तसेच त्यांनी जलसंपदाच्या कोयनानगर येथील निवासी वसाहतीची पाहणी करून डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करण्यास सांगितले. त्यामुळे तेथे १५० कुटुंबांचे स्थलांतर होऊ शकते.
जिल्ह्यातील अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर गावात दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव आणि हुंबराळे या गावांना भेट देत पाहणी केली, तसेच येथील ग्रामस्थांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगरच्या जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे जाऊनही मंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेत दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.
यावेळी मंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत केली. यासोबतच शासनाची मदतदेखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल, असेही स्पष्ट केले.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याहून पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.
चौकट :
कोयना धरण बांधताना उभारलेल्या वसाहती....
ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला आहे. कोयनानगर परिसरातील या वसाहती धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. आज त्यांची अवस्था दयनीय आहे; मात्र या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल, यावर एकमत झाले आहे. त्यामुळे मंत्री शिंदे यांनी तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.