सातारा : जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांच्या यादीला मुहूर्त लागेना, अशी जोरदार चर्चा आहे. यामुळे भाजप, शिवसेनेतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम १९९८ मधील कलम ३ च्या पोटकलम ३ मधील ४ फ अनुसार जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य निवडण्याची तरतूद आहे. जिल्हा नियोजन समितीत सध्या राष्ट्रवादी व काँगे्रसचे प्राबल्य आहे. जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने जिल्हा नियोजन समितीमध्येही या पक्षाच्या सदस्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, आघाडी शासनाची सत्ता असताना या निवडी झाल्या होत्या. निमंत्रित सदस्यांमध्ये विशेष करून सरकार नियुक्त सदस्य असतात. सरकार बदलले असल्याने शिवसेना, भाजप, रिपाइं व रासप या पक्षांना नियोजन समितीत संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, सरकारला दीड वर्ष उलटून गेले असले तरी युतीच्या शासनाला या नियुक्त्या करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छुक सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चंद्रकांत जाधव, डॉ. दिलीप येळगावकर, शेखर गोरे, अतुल भोसले, अॅड. भरत पाटील, महेश शिंदे, गणेश रसाळ, अर्जुन मोहिते, गोविंदराव शिंदे, एकनाथ ओंबळे, राजेंद्र खाडे या अकरा जणांची नावे ३ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना कळविली होती. त्याची यादी शासनदरबारी पाठविण्यात आली होती. मात्र अद्यापही त्याबाबतचा अद्यादेश निघालेला नाही. पालकमंत्री गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत, यावेळी हा विषय निघण्याची शक्यता आहे. नियोजन समिती निमंत्रित सदस्यांच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केली; पण राज्याच्या नियोजन खात्याकडे ही फाईल अडकून पडली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्यांची यादी मंत्रालयात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडीच्या यादीवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ती फाईल नियोजन खात्याकडे गेली असल्याची माहिती मला बुधवारी मिळाली. येत्या दोन दिवसांत त्याबाबत आदेश निघण्याची शक्यता आहे.- डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार