सातारा : सातारा शहरातील पोवई नाक्यावर सात रस्ते एकत्र येतात. त्यामुळे चौकात वाहनांची मोठी कोंडी होत असते. त्यामुळे सातारकरांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटर तयार केला. सुरुवातील हौस म्हणून या ग्रेड सेपरेटरचा वापर केला जात होता. मात्र आता त्याकडे सातारकरांचे दुर्लक्ष होत असून, पालिकेकडून बसस्थानकाकडे जाणारे वाहनचालक वरुनच जात आहेत. त्यामुळे सध्या तरी वापर कमी होत असल्याचे जाणवत आहे.
----------
मास्क खरेदीसाठी गर्दी
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही. तसेच सातारकरांमध्ये मास्कशिवाय बाहेर न पडण्याची चांगली सवय लागली आहे. त्यामुळे मास्क खरेदी करण्याकडे सातारकरांची गर्दी होत आहे. तसेच शहरातील चौका-चौकात, पदपथावर मास्क विक्रीसाठी आलेले आहेत.
000000
घाटातील रस्ता रुंद
खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील रस्ते प्रशस्त आहेत. त्यामुळे घाटातून वाहने चालविणे एक आल्हाददायी अनुभव आहे. रस्ता रुंद व चकाचक डांबरीकरण झालेला असल्याने कमी वेळेत घाट उतरुन वाहने खाली येत आहेत. तसेच पावसामुळे हिरवळ निर्माण झाल्याने फोटोसेशन करण्यासाठी प्रवाशी थांबत असतात.
00000
कुत्र्यांमुळे दहशत
पेट्री : सातारा तालुक्यातील काही भागात कुत्र्यांची टोळकी मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. त्यांच्याकडून माणसांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
०००००
एकेरीतून वाहतूक
सातारा : साताऱ्यातील पाचशे एक पाटी ते मोती चौकातून राजवाड्याकडून पोवई नाक्याकडे जाता येते; पण राजवाड्याकडे जाता येत नाही. तरीही अनेक दुचाकीस्वार या मार्गात एकेरीतून वाहने चालवीत असतात. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
०००
वाहनतळअभावी गैरसोय
सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील महात्मा फुले भाजी मंडईत दर रविवारी आठवडा बाजार भरतो. यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी कृषी माल विक्रीसाठी घेऊन येतात. ताज्या व चांगल्या भाज्या मिळत असल्याने हजारो सातारकर मंडईत येत असतात. पण काही वाहनचालक मंडईच्या गेटच्या आतमध्ये दुचाकी गाड्या उभ्या करत असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
००००
बटाट्याचे दर कमी
सातारा : साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत रविवारी झालेल्या आठवडा बाजारात बटाट्याचे दर कमी झाल्याचे अनुभवास मिळाले. त्यामुळे बटाटे तीस रुपयांना दोन किलो मिळत होते. साहजिकच बटाटे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.