सातारा : गेल्या दीड वर्षात जिल्हा प्रशासन सज्ज असताना कोरोनामुळे हकनाक बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे, अन्यथा आरोग्य यंत्रणा जागेवर आणण्यासाठी रिपाइं मैदानात उतरणार असल्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
गायकवाड म्हणाले, जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारी कमी केले आहेत. हा या कर्मचाऱ्यांवर अन्याय असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील अडचणीत आलेली आहे. तसेच पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित ठेकेदाराने यंत्रणा मॅनेज केली असल्याने आवाज उठवूनही कामे केली जात नाहीत. त्यामुळे गुरुवार, दि. ९ सप्टेंबर रोजी आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडण्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गायकवाड म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार आंदोलनाचा इशारा दिला असून, ठेकेदार काम करत नसून, जिल्हा प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. सातारा जिल्हा सोडला, तर इतर ठिकाणी ही कामे सुरू आहेत. पुणे जिल्हयातील टोलनाक्यावर स्थानिकांनी टोल माफी देण्यात आली आहे. मग सातारा जिल्हयातील दोन्ही टोलनाक्यांवर (एमएच ११ व एमएच ५०) या दोन्ही पासिंगच्या गाडयांना टोल माफी का नाही. जिल्हा प्रशासनाने रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद करावा, तसेच दोन दिवसात बैठक लावून याबाबत निर्णय घ्यावा. तो जर झाला नाही तर दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता आनेवाडी टोलनाका आंदोलन होईल. त्यास सर्वस्वी जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.