फलटण : ‘सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर स्वखर्चाने फलटणमधील रविवार पेठेमधील उत्कर्ष लॉज येथे ७५ बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत’, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत फलटण तालुक्यातील कोरोना आढावा बैठक घेतली. त्यावेळी फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी रणजितसिंह यांच्यासमोर आल्या. त्यामुळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरातील रविवार पेठेमधील उत्कर्ष लॉज येथे सर्व सोयीसुविधायुक्त कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर बेड्ससुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. या सोबतच रेग्युलर बेड्स सुद्धा कोरोना केअर सेंटरमध्ये असणार आहेत. आगामी काळामध्ये गरज भासल्यास बेड्स वाढविण्यासाठीची तयारी सुद्धा दर्शवली आहे.
जयकुमार शिंदे म्हणाले, ‘कोरोना केअर सेंटरबाबतचा प्रस्ताव फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे पाठविला आहे. फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाचे उपचार तातडीने मिळावेत, यासाठी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.
शासनाच्या माध्यमातून या कोरोना केअर सेंटरला मान्यता देऊन येथे डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ देण्यात यावा. या व्यतिरिक्त इतर सर्व खर्च रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वतः करणार आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून येथे डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून दिला नाही तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वतः सर्व स्टाफची नेमणूक करून कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत.