वाठार स्टेशन : उत्तर कोरेगावमधील रणदुलाबाद गावात दि. २० एप्रिल ते १ मेपर्यंत सर्व व्यवहार तसेच सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गावाबाहेरील व्यक्तीस गावात प्रवेक्ष बंद करण्यात आला आहे.
रणदुलाबाद गावच्या ग्रामकृती समितीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले असून, पुढील १० दिवस आता हे संपूर्ण गाव लॉकडाऊन असणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातही कोरोनाने फास आवळला असून, या भागातील अनेक गावांत आज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. रोजची ही भयावह आकडेवारी पाहता, आपले गाव यातून कोरोनामुक्त करण्यासाठी गावबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय रणदुलाबाद गावच्या ग्रामपंचायतीने घेतला.
सरपंच मंगेश जगताप यांनी कोरोना ग्राम समितीच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक घेऊन, आपले गाव कोरोनाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी गाव बंद करण्याचा निर्णय घेतला. यास सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने आता २० एप्रिल ते १ मेपर्यंत हे गाव संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा तसेच किराणा, भाजीपाला ग्रामस्थांना घरपोच देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.