सातारा : ‘विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना माणच्या राजकारणाचा मोह झाला आहे. त्यांनी तो मोह आवरावा, अन्यथा त्यांना अडचणीत आणू,’ असा इशारा देतच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर टीका केली. अहंकारामुळे लंकाधीश रावणाचा ऱ्हास झाला. त्यामुळे तुमचा अहंकारही राष्ट्रवादीला संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही आ. गोरे यांनी केली. जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला अविश्वास ठराव नामंजूर झाल्यानंतर शिंदे समर्थकांनी जिल्हा परिषद, शासकीय विश्रामगृहावर जल्लोष केला. यावेळी आमदार गोरे, शिवाजीराव शिंदे, फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘जिल्ह्यातील जनता आता राष्ट्रवादीचा ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीतील प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढत आहे. माझ्यासमवेत अनेक लोक आहेत. अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेले कृषी सभापती शिवाजीराव शिंदे माझ्या मतदार संघात माझ्याविरोधात काम करतात; मात्र त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि काँग्रेसने मला सहकार्य करावे, अशी मागणी केली. आम्ही त्यांना सहकार्य करायचे की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न होता. आम्हालाही राष्ट्रवादीतील प्रवृत्तीविरोधात लढायचे होते. त्यांना धडा शिकविण्यासाठी आम्ही शिंदेंना मदत केली. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचेही सहकार्य मिळाले. माझा पैसा, माझी ताकद ही रामराजेंची नेहमी भूमिका राहिली आणि त्यास आम्ही तडा दिला. राष्ट्रवादीतील प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीच्याच लोकांनी सहकार्य केले,’ असेही आमदार गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रामराजेंचा अहंकार राष्ट्रवादीला संपविणार
By admin | Updated: July 31, 2016 00:03 IST