पिंपोडे बुद्रुक : दिल्लीच्या बाजारपेठेत राजमा म्हणून ओळखला जाणारा घेवडा यावर्षी उत्पन्न कमी असूनही गडगडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गतवर्षी मिळालेल्या बाजारभावापेक्षा निम्मा दरही यावर्षी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून घेवडा ओळखला जातो. कमी पावसावर आणि ढगाळ वातावरणामध्ये केवळ अडीच ते तीन महिन्यांमध्ये उत्पादित होणारे घेवडा हे पीक असून, त्यातून कमी खर्चामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते.गेल्या काही वर्षांमध्ये घेवड्याच्या संकरित (वरुण) या वाणामुळे पारंपरिक वाघा घेवडा हा वाण जवळ-जवळ नामशेष झाला आहे. मात्र वरुण वाणाला उतारा अधिक मिळत असल्यामुळे शेतकरी या वाणालाच पसंती देतात. गतवर्षी घेवड्याचे चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले होते. त्यातून सरासरी सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दरही मिळाला होता. त्यामुळे यावर्षी सोयाबीन पेरणी कमी करून शेतकऱ्यांनी घेवड्याला अधिक पसंती दिली. त्यात यावर्षी पेरणी उशिरा झाली आहे. त्यामुळे उत्तर कोरेगाव तालुक्यातून घेवड्याच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली आहे.नुकतीच घेवडा काढणीस सुरुवात झाली असून, अपेक्षित उतारा मिळत नाही. मात्र, दरामध्येही प्रचंड घट झाली आहे.सध्या घेवड्याचा दर चार ते साडेचार हजार प्रतिक्विंटल असा व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. व्यापारी जाणीवपूर्वक असा दर कमी करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. (वार्ताहर)नैसर्गिक आपत्तीचा परिणामदिल्ली आणि पंजाब या राज्यांच्या बाजारपेठेत ‘राजमा’ विकला जातो. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्येही याला मोठी मागणी असते; मात्र यावर्षीचा जम्मू-काश्मीरमधील पाऊस आणि गतवर्षीचा चीनमधून आयात झालेला घेवडा शिल्लक असल्यामुळे आपल्या मालाचा त्या राज्याच्या बाजारपेठेत उठाव होत नाही. त्यामुळे राजम्याचे दर घटले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरेगावच्या राजम्याने आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना तारले आहे. यंदा पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्याने उत्पन्नामध्ये घट झाली आहे. घेवड्याचे दर गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षी सात ते आठ हजार रुपये क्विंटल असणारा घेवडा यंदा चार ते साडे चार हजार रुपये क्विंटलवर आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
राजमा गडगडला... शेतकरी कोलमडला
By admin | Updated: September 25, 2014 23:23 IST