आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वांत मोठी ११ सदस्य संख्या असलेल्या हिंगणगाव ग्रामपंचायतीत राजे गट पुरस्कृत भैरवनाथ विकास पॅनलला आठ जागा, तर भैरवनाथ परिवर्तनला तीन जागा मिळाल्या. हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकल्या होत्या.
यावेळी सत्ताधारी राजे गट भैरवनाथ विकास पॅनलने तरुणांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळताच भैरवनाथ
परिवर्तन पॅनलने तरुणांबरोबरच अनुभवी उमेदवारांना संधी दिली.
हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. कोपरा सभा घेतल्याने प्रचारात आघाडी घेतली होती.
भैरवनाथ परिवर्तन पॅनलने मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला.
निवडणुकीत भैरवनाथ परिवर्तन पॅनल लक्ष्मी वार्डमधून सुरेश सोपानराव भोईटे, रत्नाबाई हणमंत ठोंबरे, रोहिणी गणेश शिंदे विजयी झाले, तर राजे गट पुरस्कृत भैरवनाथ विकास पॅनलमधून वैभव कल्याणराव भोईटे, स्वाती सुरेश पांडोळे, हेमा योगेश भोईटे, विठ्ठल वाॅर्डमधून केशर महेंद्र काकडे, महेश दिगंबर पंडित, भैरवनाथ वाॅर्डमधून शिवाजी मारुती भोईटे, प्रवीण दशरथ भोईटे, दीपिका संदीप भोईटे विजयी झाल्या. यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतीमध्ये राजे गटाची सत्ता कायम आहे.