नितीन काळेल
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून २४ तासांत नवजा येथे ३८ आणि महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही पाण्याची कमी झाली असून सकाळच्या सुमारास सुमारे २१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरण पाणीसाठा ७० टीएमसी झालेला. तर पाटण तालुक्यातील तारळी धरणातून विसर्ग वाढवून ३ हजार क्युसेक सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात जून महिन्याप्रमाणेच जुलैमध्येही पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पश्चिम भागाला झोडपून काढलेले आहे. यामुळे जनजीवन प्रभावित होण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत गतवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे; पण सोमवारी रात्रीपासूनच पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना, नवजा येथे प्रत्येकी ३८, तर महाबळेश्वरला ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे २ हजार ६४, नवजाला १ हजार ८५८ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ९४० मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. सध्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झालेली आहे. सकाळच्या सुमारास २० हजार ८५७ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्हीही युनिट सुरू असल्याने २ हजार १०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. धरणातील पाणीसाठा ७० टीएमसी झाला आहे.
सातारा शहरातही मंगळवारी सकाळच्या सुमारास पावसाची उघडीप होती. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले. दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर शहराच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आलेला आहे.
जिल्ह्यात सरासरी ७.७ मिलिमीटर पाऊस...
जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ७.७ मिलिमीटर पर्जन्यामान झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ४६.४ आणि जावळीत ३०.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर सातारा तालुक्यात ९.२, पाटणला ८.१, कऱ्हाड येथे ३.७, कोरेगाव ५, खटाव येथे २.१, माणला ०.९, फलटण तालुक्यात ०.६, खंडाळा ०.४, वाई तालुक्यात ५.९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे.