कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेलीच्या हद्दीतील कऱ्हाड-मसूर रस्त्यावरील रेल्वेफाटक गुरुवारी, दि. ४ रोजी बंद राहणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत फाटक बंद राहणार असल्याबाबत रेल्वे प्रशासनाने परिसरातील ग्रामपंचायतींना कळविले आहे. क-हाड ते मसुर रस्त्यावर कोपर्डे हवेलीच्या हद्दीत रेल्वेफाटक क्रमांक ९६ आहे. या फाटकाच्या आतील दुरुस्ती, खडीकरण, तांत्रिक बिघाड दुरुस्ती आदी कामासाठी गुरुवारी दिवसभर फाटक बंद ठेवणार असल्याचे पत्रक रेल्वे प्रशासनाने सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर, क-हाड व मसूर पोलीस स्टेशन यासह लगतच्या ग्रामपंचायतींना दिले आहे.
कऱ्हाडातील चित्रपटगृहे अद्यापही बंद स्थितीत
कऱ्हाड : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १० महिन्यांपासून बंद असणारी चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय शासन पातळीवर झाला आहे. मात्र, कऱ्हाडातील चित्रपटगृहे अद्याप बंद आहेत. अजून आठ ते पंधरा दिवस तरी ती सुरू होणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवरून घेण्यात आला होता. मार्च महिन्यापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा आनंद रसिकांना घेता आला नाही. गत आठवड्यात शासनाने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कऱ्हाड शहरातील थिएटर अद्याप सुरू झालेली नाहीत.
कोरेगाव एसटी सुरू करण्याची मागणी
कार्वे : शाळा, महाविद्यालये सुरू झाली तरी क-हाड ते कोरेगाव एसटी सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी सुरू नसल्याने पालकांकडून विद्यार्थी व विद्यार्थिनींना महाविद्यालयात पाठविले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय, खासगी वाहनांची सोयही नाही. त्यामुळे क-हाड आगाराने कोरेगाव एसटी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गत १० महिन्यांपासून ही एसटी बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून क-हाडला येण्यासाठी त्यांना कार्वे गावापर्यंत चालत यावे लागत आहे. तेथून खासगी वाहनाने क-हाडला यावे लागत आहे.
रेशनकार्ड आधार लिंकसाठी मुदतवाढ
कऱ्हाड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार अद्ययावतीकरण व कुटुंबातील किमान एका व्यक्तीचा मोबाइल नंबर नोंदणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवून १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेली आहे. क-हाडच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड आधार लिंक करण्याची कार्यवाही सुरू आहे. रेशन धान्य योग्य व मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी आधारकार्ड रेशनला लिंक करण्यात येत असून दिलेल्या मुदतवाढीपर्यंत शिधापत्रिकाधारकांनी आधार लिंक करण्याचे आवाहन पुरवठा निरीक्षक गोपाल वासू यांनी केले आहे.
कऱ्हाड ते पाटण रस्ता चौपदरीकरण गतीने
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. क-हाडनजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साइडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. काही अंतराच्या एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणा-या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणा-या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.