उंब्रज : पाल, (ता. कऱ्हाड) येथे तीनपत्ती जुगार अड्ड्यावर उंब्रज पोलिसांनी कारवाई करून रोख रकमेसह तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत उंब्रज पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस हवालदार नीलेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ एप्रिल रोजी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, पाल, ता. कऱ्हाड गावचे हद्दीत अंकुश अंतू जाधव यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही जण तीनपानी जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे नीलेश पवार, दत्तात्रय लवटे यांनी छापा टाकला. तेव्हा पत्र्याच्या शेडमध्ये अंकुश अंतू जाधव (वय ४७), संदीप गुरेश कणसे (३०), रघुनाथ कुंडलिक पवार (४५), संदीप बाळासो काळभोर (३९), तुषार शंकर कॉडदिले (३०), शिवाजी हणमंत शिंदे (४४), दीपक दादासो काळभोर (३७, सर्व रा. पाली, ता. कराड) हे रंगेहाथ सापडले. हे सर्वजण स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती नावाचा जुगार बेकायदा बिगरपरवाना खेळत असताना आढळून आले.