नितीन काळेल
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने राबविली आहे, ती रद्द करुन नव्याने घेण्यात यावी, अशी याचिका राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाखल केली आहे. यामध्ये विविध मुद्यांचाही समावेश आहे. यामुळे अध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी २० मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडीवेळी जोरदार राडा झाला होता. भाजपने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्याचवेळी पोलिसांनी एका तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेतून बाहेर काढून नेले होते. त्यामुळे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता.
या निवडणुकीचे पडसाद राज्यात उमटले होते. राज्याच्या विधीमंडळातही यावर चर्चा झाली. तसेच पोलिसांवरही आरोप झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या सदस्यांकडून ही निवड प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने झाली असून ती नव्याने करण्याची मागणी होत होती. यासाठी जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही फुटेजचीही मागणी करण्यात आली आहे. अशातच आता पुणे विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.
अध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार राहिलेल्या मनिषा फडतरे, उपाध्यक्षपदासाठीचे अशोक पाटील, सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी वकिलांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने निवडणूक प्रक्रिया राबवली आहे. ती रद्द करावी आणि नव्याने घ्यावी अशी मागणी केलेली आहे. आता याचिकेवरील सुनावणीकडे लक्ष लागून राहणार आहे.
Web Summary : Nationalist Congress and Shinde Sena challenge Satara Zilla Parishad president election, citing procedural errors. They've petitioned for a fresh election following a controversial vote marred by political drama and allegations of police interference.
Web Summary : राष्ट्रवादी कांग्रेस और शिंदे सेना ने सतारा जिला परिषद अध्यक्ष चुनाव को चुनौती दी, प्रक्रियात्मक त्रुटियों का हवाला दिया। उन्होंने राजनीतिक नाटक और पुलिस हस्तक्षेप के आरोपों से ग्रस्त एक विवादास्पद वोट के बाद नए चुनाव के लिए याचिका दायर की है।