पुसेगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने वारंवार केलेल्या सूचनांचे व्यावसायिक आणि नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगाव व परिसरातील गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या पुसेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये ६९ ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आजअखेर पुसेगावचा कोरोनाबाधितांचा आकडा ५१ वर गेला असल्याने, बुधवार, दि. २१ पासून सोमवार दि. २६ अखेर सहा दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पुसेगाव बाजारपेठेतील सर्व व्यापारी, दुकानदार व ग्रामस्थ यांनी सर्वानुमते घेतला.
पुसेगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला गावातील सर्वच प्रकारचे व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामस्तरीय सुरक्षा समितीचे सहअध्यक्ष, तलाठी गणेश बोबडे, सचिव, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे, मंडलाधिकारी तोडरमल, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाच्यावतीने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही निर्बंध ठेवून लॉकडाऊन करण्यात आला. कडक वीकेंड लॉकडाऊन ठेवला तरीही, नागरिक या ना त्या कारणाने घराबाहेर पडतच आहेत. अगदी होम क्वारंटाईन व्यक्तीही फेरफटका मारताना दिसत आहेत.
त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध होण्याऐवजी खत-पाणीच दिल्यासारखे होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत लोकांची गर्दीच होऊ नये म्हणून केवळ दवाखाना व मेडिकल दुकाने वगळता सर्वच दुकाने व भाजीपाला विक्री बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
गेल्या १५ दिवसांपासून पुसेगाव व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. एकेका दिवशी १२ किंवा १३ रुग्णांची वाढ होऊनही नागरिक कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले असले तरी बहुतांश व्यापारी, व्यावसायिक, विनाकारण फिरणारे नागरिक पळवाटा शोधून सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत. पुसेगावामध्ये बाधितांची संख्या वाढून ५१ वर पोहोचली, तरी परिस्थितीत काही फरक पडत नसल्याने व्यापारी व दुकानदार यांनीच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूची तयारी केली आहे.
पोलीस, महसूल, ग्रामपंचायत आणि दक्षता समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या कालावधीत फक्त औषध दुकाने, दवाखाने आणि दूध संकलन केंद्रे सुरू राहणार आहेत. मंगळवार, दि. २७ पासून बाजारपेठेतील व्यवहार कोरोना निर्बंध पाळत पूर्ववत सुरू राहणार आहेत.
१९पुसेगाव
पुसेगाव (ता. खटाव) पोलीस ठाण्यात जनता कर्फ्यूबाबत आयोजित केलेल्या बैठकीत व्यापारी, दुकानदार, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्तरीय सुरक्षा समिती, महसूल व आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सूचना दिल्या.