घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी रेल्वे स्थानकातून मुख्य वीज वाहिन्या गेल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी एक मनोरुग्ण खांबावर चढून संबंधित वीज वाहिन्यांना लटकू लागला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. रेल्वे स्थानकातील प्रवाशांचीही त्यामुळे तारांबळ उडाली. संबंधित वाहिन्यांमधून वीज पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, अनेकांनी सांगूनही संबंधित मनोरुग्ण वाहिन्या सोडून खाली उतरण्यास तयार नव्हता. अखेर काहीजणांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधिताला खाली उतरण्याची सूचना केली. मात्र, त्याने पोलिसांचेही ऐकले नाही. अखेर मोठ्या शिड्या आणून काही युवक वीज वाहिन्यांवर चढले. त्यांनी प्रयत्न करून मनोरुग्णाला खाली उतरवले. विद्युत प्रवाह सुरू नसल्यामुळे नागरिकांना संबंधिताचे प्राण वाचविता आले. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असून, मूळचा झारखंड येथील रहिवासी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
फोटो : ०३केआरडी०५
कॅप्शन : ओगलेवाडी रेल्वे स्थानकातील वीज वाहिन्यांवर लोंबकळत असलेल्या मनोरुग्णास स्थानिक नागरिकांनी वाचविले.