मसूर : ‘या तलावातील साठल्या जाणाऱ्या पाण्यामुळे अंतवडीतील सुमारे ३८० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या तलावाच्या परिसरातील कूपनलिका व विहिरींना पाण्याचा स्रोत वाढण्यास मदत होणार आहे. अंतवडी गावचे जास्तीत जास्त क्षेत्र बागायत होईल. तलावामुळे शेतीसह गावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी मिटेल,’ असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
अंतवडी, ता. कऱ्हाड गावासाठी वरदान ठरणाऱ्या लघु पाटबंधारे तलावाच्या कामाची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, कोपर्डेचे सरपंच नेताजी चव्हाण, अंतवडीचे सरपंच युवराज शिंदे, सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, जिजाबा शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र शिंदे, जलसंधारण विभागाचे अभियंता श्रीकांत आढाव, कनिष्ठ अभियंता वृषाली वाघमारे, ठेकेदार विजय देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.