कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या एप्रिल-मे महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सत्ताधाऱ्यांना थोपविण्यासाठी विरोधी दोघांनी एकत्र येण्याची गरज काहीजण व्यक्त करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा व सांगली जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याचे चाळीस हजारांवर सभासद आहेत. त्यामुळे या कारखान्यातील सत्ता दोन जिल्ह्यांतील बऱ्याच तालुक्यांवर राजकीय परिणाम घडविणारी ठरते. परिणामी या निवडणुकीकडे दोन्ही जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांचे नेहमीच लक्ष राहते. सत्तास्थापनेत अथवा परिवर्तनात यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
सध्या कारखान्याची सत्ता ही डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या गटाकडे आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सध्या दोन मोहिते स्वतंत्रपणे शड्डू ठोकत आहेत. पैकी एक काँग्रेसचे, तर दुसरे राष्ट्रवादीचे आहेत; पण दोघांच्या भांडणात पुन्हा एकदा तिसऱ्याचा लाभ होईल का? अशी धास्ती कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळेच डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी एकत्रित येऊन भोसले यांच्याविरुद्ध लढावे असाही एक मतप्रवाह सुरू झाला आहे.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका ही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. पण, त्यांनी ती सध्या स्पष्ट केलेली नाही. रविवारी सकाळी कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेसचे काही प्रमुख कार्यकर्ते थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानावर पोहोचले. त्यावेळी कार्यकर्त्यांनीच कृष्णा कारखाना निवडणुकीत कसं? तुमची भूमिका काय? आम्ही काय? करायचं? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावर उद्या आपण बैठक घेऊन बोलू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलात कऱ्हाड दक्षिणमधील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा ‘संगम’ झाला. यावेळी पृथ्वीराज यांनी थेट माईक कार्यकर्त्यांच्या हातात द्यायला सांगितला. अगोदर तुम्ही बोला मग आम्ही बोलतो असे ते म्हणाले. मग या दोघांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांनी एकापाठोपाठ एक मत मांडायला सुरुवात केली. कोणी महाविकास आघाडीचा सूर आळविला तर कोणी एकला चलो रे ची भूमिका मांडली.
कार्यकर्त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध पवित्रा घेत अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तुमच्या भावना मी जाणून घेतल्या आहेत. काय करायचं हे बघूया; पण तोवर संयम राखा. एकमेकांवर उगाच टीका करू नका, असा सबुरीचा सल्ला दिला. आता हा सल्ला कोण -कोण पाळतोय हे पाहावे लागेल.
चौकट :
म्हणे, तुम्हाला काय अवघड हाय ..
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी तयार करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करायला तुम्हाला काय अवघड हाय, असे मत एका कार्यकर्त्याने पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून यावेळी व्यक्त केले.
फोटो :