वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच वाढलेल्या साखर कारखानदारीमुळे गाळप हंगामाचा समारोप एप्रिलअखेर होत आहे. वेळेत सुरु झालेल्या चालू वर्षीच्या ऊस गाळप हंगामात गतवर्षीप्रमाणेच ऊसदराचे तंत्र शासनाने राबवल्याने कोणत्याही संघर्षाशिवाय या हंगामातील गाळप यशस्वी झाले. आज अखेर जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ६४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत ७५ लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.एफआरपीनुसार ऊसदर हे तंत्र गतवर्षी यशस्वी ठरल्यानंतर चालू वर्षीच्या गाळप हंगामातही एफआरपीनुसार दर देण्याची भूमिका शासन व साखर आयुक्तांनी घेतली. मात्र बाजारपेठेतील साखरेच्या दराची अस्थिरता विचारात घेता आणि राज्य बँकेचे मिळणारे मूल्यांकन बघता एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना शक्य नसल्याने एफआरपीचा कायदा बाजूला ठेवत ८०-२० असा नवा फॉम्युला निश्चित केला. त्यानुसार ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत ८० टक्के व गाळप संपण्यापूर्वी उरलेली २० टक्के रक्कम देण्याबाबत सहमती दिली.चालू हंगामात उसाचे क्षेत्र गतवर्षी एवढेच असल्याने मे अखेर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती व पावसाने ओढ दिल्याने उसाचे सरासरी उत्पादनही कमी झाले तर या हंगामात दोन नवीन कारखानेही वाढले, यामुळे महिनाभरातच शिल्लक उसाचे आव्हान पेलण्याचे काम कारखान्याकडून पूर्ण होईल. (वार्ताहर)‘कृष्णा’ने केले सर्वाधिक गाळपआज जिल्ह्यात कृष्णा कारखान्याने सर्वाधिक ९ लाख ३९ हजार ९१० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत १० लाख ९२ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर या पाठोपाठ सह्याद्री साखर कारखान्याने ९ लाख २२ हजार ४०० मे. टन उसाचे गाळप पूर्ण करीत ११ लाख ७५ हजार ४९० क्विंटल साखर उत्पादित करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर किसन वीर कारखान्याने ५ लाख ६१ हजार ८६० मे. टन उसाचे गाळप करत ६ लाख ३८ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.तोडणी यंत्रणेवर उन्हाचा परिणामसद्य:स्थितीत उन्हाचा दाह वाढत चालला आहे. याचा परिणाम तोडणी यंत्रणेवर होत असून बहुतांशी कारखाने क्षमतेपेक्षा कमी गाळप करू लागले आहेत.
जिल्ह्यात आजअखेर ७५ लाख क्विंटल साखरनिर्मिती
By admin | Updated: March 16, 2016 23:40 IST