कुडाळ : कुडाळ परिसरात गेली तीन-चार दिवसांपासून चांगलाच उष्मा वाढला होता. यामुळे बुधवारी दुपारी चारच्यासुमारास ढगांच्या गडगडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांच्या काढणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अर्धा तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने मात्र वाढत्या उष्म्याची दाहकता काहीशी कमी झाली आहे.
परिसरातील रब्बीच्या काढणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. वाढत्या उष्म्यामुळे आलेल्या वळवाच्या पावसाने सगळ्यांचीच धावपळ झाली. भागातील बहुतांश ठिकाणी रब्बीच्या पिकांची काढणी झालेली आहे. शेतकऱ्यांची आता धान्य वाळवणीची कामे सुरू आहेत. आज अचानक आलेल्या पावसाने धान्य झाकण्यासाठी त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे शेतात उभ्या असणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ज्वारीच्या पिकावर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.