वाठारस्टेशन : ‘देऊर, ता. कोरेगाव येथील पिण्याचा व शेतीचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी गावातील ओढे व नाल्यांवर जलसंधारणाची अधिकाधिक कामे केली जातील. तसेच वसना नदीपात्राचे खोलीकरण-रुंदीकरण करीत या नदीपात्रात नव्याने दोन केटी वेअर बंधारा बांधून जास्ती जास्त पाणी आढविले जाईल. त्यामुळे देऊर गावाला भविष्यात कधीही पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही,’ असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. देऊर येथे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, तसेच जलयुक्त शिवार अंतर्गत देऊर तळहिरा ओढ्यावर सिध्दिविनायक ट्रस्ट तर्फे मिळालेल्या ५१ लाखांच्या चार सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालन गायकवाड होत्या. यावेळी शिवाजीराव महाडिक, जालिंदर कदम, भास्कर कदम, उपसरपंच ज्ञानदेव कदम, शांताराम दोरके, गुलाबसिंग कदम, गोकुळ रानभरे, अनिल पवार आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, राष्ट्रीय पेयजल योजना या सर्वाधिक प्रमाणात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राबवल्या; मात्र देऊरकरांच्या या पाणीयोजनेत गाव अंतर्गत मतभेद असल्याने ही योजना रखडली गेली. मात्र, या वर्षाअखेर गावासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी पाणी योजना मार्गी लावण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. देऊर गाव दत्तक घेतले असल्याने या गावचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. शांताराम दोरके यांनी प्रास्ताविक केले. गुलाबसिंग कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विभागीय कृषी अधिकारी भुजबळ, तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)