सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे हे वैद्यकीय बिले लवकर मंजूर करत नाहीत, त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यपद्धतीचा वसतिगृहचालकांना त्रास होतो, आदी तक्रारी दाखल झाल्यानंतर पुणे येथील शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी शनिवारी अहिरे यांची चौकशी केली. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.सातारा जिल्ह्यातील काही वसतिशाळा कार्यरत आहेत. त्यांच्यावर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे हे त्रास देत असतात. विविध प्रकारांचे बिले लवकर मंजूर करत नाहीत, आदी तक्रारी जिल्ह्यातील वसतिगृहातील बारा जणांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. पुण्याचे शिक्षण सहसंचालक गोविंद नांदेडे यांनी आज (शनिवारी) साताऱ्यात भेट दिली. त्यांनी यावेळी बाराही तक्रारदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलाविले होते. तक्रारदारांकडून तक्रारींसंदर्भातील विविध प्रश्नांचा समावेश असलेल्या प्रश्नावली भरून घेतली. त्याचप्रमाणे वैद्यकीय बिलांसंदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडूनही प्रश्नावली भरून घेतली. नांदेडे यांनी अहिरे यांची चौकशी केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
प्रवीण अहिरे यांची चौकशी
By admin | Updated: December 13, 2014 23:53 IST