कऱ्हाड : ‘राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे यांचे शेतकऱ्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सत्ता आल्यावर शहाणपण सुचण्यातला प्रकार आहे,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला़ यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते़ चव्हाण म्हणाले, ‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ त्यामुळे पंचनामे अन् केंद्र सरकारच्या आदेशाची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत द्यावी़ त्यात विलंब केला तर काँग्रेस पक्ष राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल़’‘सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सामान्य जनतेची घोर फसवणूक केली आहे़ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी अनेक आश्वासने दिली; पण ती आता पाळली जात नाहीत़ त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे़ जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसेल तर काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल़,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सत्ता आल्यावर शहाणपण सुचतं!
By admin | Updated: November 25, 2014 23:46 IST