वाई : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापायला लागलेले असतानाच वाई तालुक्यातील अभेपुरी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने राजकीय खुन्नशीतून दहा शेतकऱ्यांच्या शेतातील भाताच्या तरव्यावर तणनाशकाची फवारणी केली आहे. तसेच शेतीपाणी योजनेच्या वीजगृहातील साहित्य तोडून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. याबाबत माहिती अशी की, अभेपुरी येथील शेतकरी कऱ्हाड, कर्जत येथून नवनवीन जातीचे बियाणे आणतात. यंदाही शेतकऱ्यांनी बासमती ३७०, इंद्रायणी इंडम यासारख्या भाताच्या बियाण्यांच्या रोपांचे तरवे केले होते. गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच रविवारी लिंगवात व वाडा या दोन शिवारातील शेतकऱ्यांच्या भाताच्या रोपाच्या तरव्यावर अज्ञातानी तणनाशकाची फवारणी केली. याचा परिणाम दोन-तीन दिवसांनंतर दिसायला लागला आहे. रोपे जळायला लागली आहेत, त्यानंतर कोणीतरी तणनाशक फवारल्याचे लक्षात आले. तसेच काही शेतपाणी योजनेच्या वीजगृहातील साहित्यांचे नुकसान केले आहे. यामध्ये झुंजार मांढरे यांचे ७५ किलो, विजय मांढरे यांचे २० किलो, महादेव मांढरे यांचे ६० किलो, भानुदास मांढरे यांचे १० किलो, अशोक मांढरे यांचे २० किलो, सोमनाथ मांढरे यांचे १० किलो, दिपक पवार यांचे २५ किलो असे सुमारे २२५ किलो बियाणे जळाले. यामध्ये दहा ते पंधरा एकर शेतात भाताची लागण झाली असती. (प्रतिनिधी)तीन दिवसांपूर्वी शिवारात भाताच्या रोपाच्या शेतावर गेलो असता तरवा पिवळा व वाळून जाऊ लागल्यासारखा दिसू लागला. म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविला असता त्यावर तणनाशक फवारले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.- झुंजार मांढरे, शेतकरी
गावचे राजकारण पिकाच्या मुळावर
By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST