जिल्हा पोलीस दलातील व सध्या वाई पोलीस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी संग्राम शिर्के (वय २६, मूळ रा. किडगाव, ता. सातारा) यांचा शुक्रवार रात्री अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस संग्राम शिर्के यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. २६) रात्री त्यांचा मृत्यू झाला. संग्राम शिर्के यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. रायगाव (ता. जावळी) गावचे हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलीस संग्राम शिर्के यांच्या वडिलांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, ज्या वाहनाने पोलीस कर्मचारी संग्राम शिर्के यांना धडक दिली. त्या वाहनाचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.