भुर्इंज : ‘किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ होण्याबरोबरच ऊस उत्पादन खर्च कमी हेण्याच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला यंत्राद्वारे ऊस लागवडीचा प्रयोग यशस्वी झालेला आहे. मनुष्यबळ, उत्पादन खर्चात बचत करणारे ऊस लागवड यंत्र, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सामूहिक मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येईल,’ असे प्रतिपादन अध्यक्ष मदन भोसले यांनी केले. ऊसलागवड यंत्राचे प्रात्यक्षिक कार्यस्थळावरील श्री माणकाईदेवी ऊस नर्सरीत दाखविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नेटाफिकम इरिगेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख, कार्लो कार्ली व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती. ऊसलागवड यंत्राची माहिती देताना अरुण देशमुख म्हणाले, ‘राज्यात ऊस हे सर्वाधिक प्रमाणात घेतले जाणारे नगदी पीक असून, पारंपरिक पद्धतीने ऊसलागवड करण्यास येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत या मशीनने ऊसलागवड केल्यास लागवड खर्चात पन्नास टक्के बचत होते. या मशीनने आठ तासांत पाच एकर क्षेत्रामध्ये ऊस रोपांची लागवड करता येते.’ दरम्यान, कारखाना व नेटाफिम इरिगेशनच्या वतीने कार्यस्थळावर आयोजित ऊस लागवड यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यास शेतकऱ्यांनी गर्दी केलेली होती. नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले. संचालक रतनसिंह शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पाटखळचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, मालोजीराव शिंदे, अश्विनी रावराणे, एम. जी. थोरात, संजय पाटील, संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
यंत्राच्या साह्याने ऊस लागवड
By admin | Updated: October 11, 2015 00:07 IST