कुडाळ : ‘जावळीत कुडाळ येथे साकारलेले पिंपळबन हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, आजच्या धावपळीच्या जीवनात घटकाभर विसाव्यासाठी कुडाळच्या युवकांची ही संकल्पना आरोग्यदायी जीवनासाठी लाभदायी ठरणार आहे’, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
कुडाळ (ता. जावळी) येथे लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या पिंपळबनमधील बालोद्यान व ओपन जीमच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, हृषिकांत शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, बुवासाहेब पिसाळ, तानाजीराव शिर्के, आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, ‘पिंपळबन हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, पिंपळाच्या माध्यमातून चोवीस तास ऑक्सिजन मिळत असतो. यातून लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ होण्यास मदत होणार आहे. आजच्या परिस्थितीत वनांची हानी झाल्यामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यासारखी संकटे येत आहेत.’
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘कुडाळच्या युवकांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पिंपळबनला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. कुडाळ येथील युवकांच्या अथक परिश्रमाला सर्वसामान्य स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यामुळेच आज या प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण होत आहे.’
यावेळी माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश गोंधळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पिंपळबनचे संकल्पक महेश पवार यांनी प्रास्ताविक केले तर राहुल ननावरे यांनी आभार मानले.
०५ कुडाळ
फोटो : कुडाळ येथील पिंपळबन बालोद्यानाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सौरभ शिंदे, जयश्री गिरी, हृषिकांत शिंदे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. (छाया : विशाल जमदाडे)