सातारा : मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेले व चोरट्यांचा अड्डा बनलेले फलटण रेल्वे स्थानक आता कात टाकू लागले आहे. रेल्वे मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात रंगरंगोटी करण्यात आली असून, स्थानकाचे हे नवे रूप प्रवाशांना आकर्षिक करू लागले आहे.
फलटण शहराजवळ चार वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक सुरू करण्यात आले. मात्र, लोणंद ते फलटण एवढेच रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले, तर बारामती बाजूकडील काम रखडले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून प्रवासी वाहतूक सुरू नसल्याने रेल्वे स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. येथील दारे, खिडक्या चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले हाेते. या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दीड वर्षापूर्वी फलटण ते लोणंद लोकल रेल्वे सेवा सुरू केली. त्यामुळे रेल्वे स्थानकाची डागडुजी होऊन रेल्वे स्थानकावर वर्दळ सुरू झाली. मात्र लॉकडाऊनच्या कालावधित पुन्हा फलटण-लोणंद रेल्वे सेवा बंद पडल्यामुळे रेल्वे स्थानकाची मोठी दुरवस्था झाली होती.
रेल्वे स्थानकावर सुरक्षा रक्षक नसल्याने रेल्वे स्थानकाचा परिसर चोरट्यांचा अड्डा बनला होता. त्यामुळे या स्थानकाची सुधारणा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या मागणीनुसार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. दि. ३० मार्च रोजी रेल्वेमंत्र्यांच्याहस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. रेल्वेमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रेल्वे स्थानकाची डागडुजी व सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात आले. स्थानकाचा परिसर स्वच्छ करून संपूर्ण इमारतीचे रंगकाम करण्यात आलेले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने रेल्वे स्थानकाचे रूप बदलून गेले आहे.
(चौकट)
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते दि. ३० मार्च रोजी फलटण ते पुणे अशी नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार असून आणखी काही गाड्या सुरू केल्या जातील. रेल्वे स्थानकात मूलभूत सेवा-सुविधा प्राधान्याने उपलब्ध केल्या जातील. फलटण रेल्वे स्थानकाची मोठी दुरवस्था झाली होती. येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार
फोटो : २३ फलटण रेल्वे स्थानक