वाठार निंबाळकर : ‘गेली तीस वर्षे तालुक्यातील सर्वच गावात सर्वांगीण विकासासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले असल्यानेच तालुक्यातील ग्रामस्थ आपल्या सोबत राहिले,’ असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
उपवळे (ता. फलटण) येथील अंतर्गत रस्ता, सभामंडप भूमिपूजन व वृक्षरोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, महादेव माने, सरपंच दीपाली जगताप, मल्हारी जाधव, संतोष नेवसे, शैलेश जगताप, अरविंद थोरात, रामचंद्र कोरडे, सुधीर पवार, मुसाभाई मोमीन, सुधीर नाचणं, अशोक जगताप, विकास जगताप, जगनाथ लंभाते, दामोदर चव्हाण, संदीप लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘कोरोना काळातही तालुक्यातील विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, राज्यात आघाडी सरकारने आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना इतर विकासाची कामे यामध्ये रस्ते, सार्वजनिक व प्रशासकीय इमारती, पाणीपुरवठा योजना आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तालुक्यात आजपर्यंत विकास झाला असून, यापुढेही सुरू राहील.’ यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच दीपाली जगताप यांनी स्वागत केले. मल्हारी जाधव यांनी आभार मानले.