रामापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड ढगफुटीमुळे केरा विभागातील आंबवणे, चिटेघरसह इतर गावांतील शेतीक्षेत्र, घरांची पडझड, वीजपोल, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेततळी, ताली, साकवपूल, पाझर तलाव, रस्ते वाहून गेले. त्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे. या नुकसानीची राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर व पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशा सूचना केल्या.
पाटण तालुक्यातील केरा विभागात बुधवार, गुरुवारी मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला. येथे ढगफुटी झाल्याने पावसाने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. विशेषकरून आंबवणे, घाणव, चिटेघर या गावांना ढगफुटीचा मोठा फटका बसला आहे. या ढगफुटीमुळे आंबवणेसह इतर गावांमधील रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, नळपाणीपुरवठा योजना, पाण्याच्या टाक्या, विहिरी, पाझर तलाव, जलवाहिनी, साकवपूल, शेततळी यासह शेतीक्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. पिके तर मातीत गाडली गेली आहेत. घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने ओढ्यावरील पूल व रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. याठिकाणी गावचे दळणवळणच बंद झाले असून विद्युतपुरवठाही तीन दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.
एकंदरीत केरा विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. केरा विभागातील ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर व सभापती राजाभाऊ शेलार यांनी केली. आंबवणे येथे सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ‘हा ढगफुटीचाच हा प्रकार असून आंबवणे गावातील दोन्ही साकव पूर्णपणे वाहून गेले आहेत. दळणवळणाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेचीही फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे या गोष्टी पूर्ववत कशा होतील, याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. केवळ पंचनामे करून न थांबता आर्थिक तरतूदही झाली पाहिजे.’
चौकट :
पंचायत समितीकडून मदत
‘सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. पंचायतराज व पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी करायला लागतील, त्या त्या करू. पिण्याच्या पाण्याच्या योजनाही पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तात्पुरत्या दुरुस्त करू. पण, कायमस्वरूपी जलजीवन मिशन योजनेत या योजना कशा येतील, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे’, अशी माहिती सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली.
फोटो २०रामापूर
पाटण तालुक्यात सलग दोन दिवसांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार यांनी पाहणी केली. (छाया : प्रवीण जाधव)