सातारा : आतापर्यंत आपण महाविद्यालयांमध्ये फक्त मुलांचाच राडा होत असल्याचे पाहत आलो आहोत; पण आता मुलीही यात कमी नाहीत. याचा प्रत्यय नुकताच साताऱ्यात अनुभवयास मिळाला. शांत, संयमी असलेल्या मुली सार्वजिनक ठिकाणी फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात हा वाद साऱ्यांच्याच औत्सुक्याचा ठरला.
शहरातील एका प्रतिथयश महाविद्यालयासमोर मुलींच्या दोन गटांत दोन दिवसांपूर्वी तुंबळ फ्री स्टाईल हाणामारी झाली. हा प्रकार घडल्यानंतर वाद घालणाऱ्या मुली स्वत:हून निर्भया पथकाच्या चाैकीत गेल्या. पोलिसांना वादाचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला सबुरीने घेतले; पण अनेकांच्या स्टेटसवर या मुलींची फ्री स्टाईल हाणामारी पोहोचल्यानंतर हे साधेसुधे प्रकरण नसल्याचे पोलिसांना उमगले. त्यानंतर मात्र, व्हिडिओमधील मुलींचा शोध घेत पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. निर्भया पथकाच्या पोलीस चाैकीत त्यांना नेण्यात आल्यानंतर त्यांच्या वादाचे कारण एकून पोलीस अवाक् झाले. या मुलींची वैयक्तिक कारणे चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. या साऱ्या अल्पवयीन मुली आहेत. कायद्यातून त्यांना सुटका मिळाली असली तरी या मुलींच्या फ्री स्टाईलचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागला. मुलींच्या तक्रारींसाठी तेही पोलीस ठाण्यात जाण्याची पालकांवर पहिल्यांदाच वेळ आली. त्यामुळे पालकही संतप्त झाले. मात्र, निर्भया पथकाने हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले. मुलींकडून समुपदेशन फाॅर्म भरून घेऊन पालकांना सीआरपी १४९ नुसार नोटीस बजावण्यात आली.
पोलिसांनी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले असले तरी या वादाचे परिणाम अन्य मुली-मुलांवर होऊ नयेत, यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चाैकट : व्हिडिओ व्हायरल करण्याऱ्यांवर होणार कारवाई
मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या मुली अल्पवयीन आहेत. अशाप्रकारे सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरलं करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यांचा पोलीस शोधून घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.