अकरावी प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदाही अकरावीचे प्रवेश ‘ऑनलाइन’ घेण्यासाठी महाविद्यालयांनी आवाहन केले. मात्र, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला अर्ज महाविद्यालयात पोहोचला का नाही, याची खात्री करण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांसह कॉलेजात फेऱ्या माराव्या लागत आहेत.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया १८ ऑगस्टपासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यासाठी २५ ऑगस्टची मुदत आहे. त्यानंतर ३० ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यंदा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने गुणवत्ता यादी उंचावलेली राहणार आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे पूर्वीइतके सोपे नक्कीच राहिलेले नाही.
दरम्यान, सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यातही विज्ञान आणि कला या शाखांकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो. ग्रामीण भागातील मुलांचा सर्वाधिक कल हा कला व वाणिज्य शाखांकडे दिसून येत आहे.
चौकट :
कोविड नियम पाळून ऑफलाइनही सुरू
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन अर्ज भरण्याकडे कल आहे. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना ऑनलाइन प्रक्रिया समजावून सांगण्यापेक्षा त्यांना थेट महाविद्यालयात बोलावून प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, त्यांनी ऑनलाइन अर्ज भरले; पण ते महाविद्यालयात पोहोचले का, हे पाहण्यासाठीही पालकांना फेरी मारावी लागत असल्याचे चित्र दिसते.