फोन करताच दारात वाहन येण्याची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मलकापुरात ‘एक नगरपालिका, एक गणपती’ या सकारात्मक निर्णयाबरोबरच शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा अनोखा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी पालिकेने गणेश विसर्जनाचा कृती आराखडाच तयार केला आहे. शहरातील नऊ प्रभाग अध्यक्षांसह प्रत्येकी एक नोडल अधिकारी व पाच ते सहा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. नऊ छोट्या टेंपोसह दोन ट्रॅक्टर अशी १० वाहनांची व्यवस्था केली आहे. घरातूनच गणेशाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी फोन करताच विसर्जनासाठी वाहन पाठवण्याचे नियोजन आहे.
मलकापूरने आत्तापर्यंत देशाला व राज्याला अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम दिले. सर्वांना विश्वासात घेऊन दोन दिवसांतच शहरातील मंडळांनी या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा देत नुकताच ‘एक नगरपालिका, एक गणपती’ हा आदर्श निर्णय सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह मंडळांनी घेतला. या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच गणेश विसर्जनाचीही पालिकेने जबाबदारी घेतली आहे. कोरोनामुळे यावर्षीही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती गणपतींचेही विधीवत विसर्जन करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. यासाठी पालिकेने शहरातील नऊ प्रभागांसाठी नऊ अध्यक्ष, प्रमुख अधिकाऱ्यांपैकी नऊ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. हे अधिकारी आपापल्या प्रभागातील घरगुती गणेश विसर्जनाचे तारखेसह वेळेनुसार नियोजन करतील. त्यांच्या जोडीला पाच ते सहा स्वयंसेवकांसह नऊ छोट्या टेंपोंसह २ ट्रॅक्टर अशी दहा वाहनांचीही व्यवस्थाही केली आहे. नोडल अधिकाऱ्यांना फोन केल्यास थोड्यावेळात वाहन पाठवून विसर्जनाची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातूनच गणेशाला निरोप देऊन आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी पालिकेच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट
अनंत चतुर्दशीला दोन जलकुंडांची सोय
पालिका पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी दरवर्षी अहिल्यानगर व आगाशिवनगरसह शहरात काही ठिकाणी कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था करते; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे मलकापुरात सार्वजनिक उत्सव व विसर्जनालाच फाटा देण्यात आला होता. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जनावेळी पालिकेने शहरात यावर्षी दोन ठिकाणी कृत्रिम जलकुंडांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे.
चौकट
विसर्जनासाठी विहिरींचा वापर
मलकापुरातील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे जाधव पाणवठा, पाचवडेश्वर व प्रीतिसंगमावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. यावर्षी मलकापूर पालिकेने पर्यावरणपूरक विधिवत गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. नदी प्रदूषण व गर्दी टाळण्यासाठी पालिकेनेच विसर्जनाची जबाबदारी घेतली आहे. विसर्जनासाठी तीन वाहिरी आणि खाणींचा वापर करण्याचे नियोजन केले आहे.