संडे स्पेशल..
वाई तालुक्यातील उडतारे गावचे गणेश बजरंग बाबर सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेली आहे. पाचटीच्या घरामध्ये कंदिलात अभ्यास करून ज्ञानाच्या बळावर पुढे आलेल्या बाबर यांनी श्लोका नर्सरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावले. उडतारे येथे ज्या ठिकाणी त्यांचे पाचटीचे घर होते, तेथेच आता आलिशान बंगला त्यांनी उभा केला आहे.
पुणे-बंगलोर महामार्गालगत उडतारेमध्ये गणेश बाबर यांची ही नर्सरी आहे. नर्सरी लगतच लक्ष वेधून घेणारा त्यांचा बंगला देखील आहे. सध्या उभा केलेला त्यांचा डोलारा मोठा असला तरी यशस्वी होण्याची सुरुवात अत्यंत खडतर होती. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सातत्य यामुळे ते यशस्वी उद्योजक बनले आहेत.
लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. पण वर्गामध्ये प्रथम क्रमांक सोडला नाही. बाळासाहेब पवार हायस्कूलमधील भिकाजी मोहिते सर, मोकाशी सर, सुरेश शिंगटे सर या शिक्षकांनी या मुलाची गुणवत्ता लक्षात घेऊन तो शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी रामकृष्ण चारिटेबल ट्रस्ट माध्यमातून शिक्षणाची सोय केली. दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढील शिक्षणाला मामांनी मदत केली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे येथून गणेश यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण केले.
नोकरी करायची नाही व्यवसायच करायचा या हेतूने त्यांनी पदवीचे प्रमाणपत्र मिळण्याआधीच पुण्यातील एका नर्सरीत काम सुरू केले. अवघ्या दीड हजारात पगारात ते काम करत होते; मात्र या ठिकाणी त्यांनी सर्व गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर वाई शहराजवळ नर्सरी सुरू केली. नर्सरीमध्ये अनेक प्रयोग केले. पाचगणी, वाई, महाबळेश्वर या परिसरात एसटीने फिरून लाॅडस्कॅपिंगचे कामे मिळवली. बाजार समितीत पत्रके वाटली. पुढे पुण्यातील तळेगावात आपल्या लोका नर्सरीचा विस्तार वाढवला. पुण्यात मात्र त्यांना मोठी कामे मिळू लागली. मग गावी आलिशान बंगला बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाचटीच्या घराच्या ठिकाणी आज त्यांचे श्लोका नावाचे आलिशान घर उभे आहे. उडतारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे मार्गदर्शन ते उत्साहाने देताना दिसतात.
मित्राने दिले पाच हजारांचे भांडवल...
वाईत नर्सरी सुरू असताना उडतारेतून वाईला जायला एसटीने जावे लागत होते, यासाठी पैसा देखील जवळ नव्हता. मात्र एका मित्राने परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना पाच हजारांची मदत केली होती. हेच ५ हजार रुपये त्यांना पुढे घेऊन जाण्यात उपयोगी ठरले. उडतारे येथील त्यांच्या बंगल्याशेजारी मोठी नर्सरी आहे. या नर्सरीत अनेक प्रकारच्या प्रजातीची झाडे आहेत. नर्सरीमध्ये ते अनेक प्रयोग करत असतात.
वाईट रस्त्यावर झाडे विक्री; आता महाराष्ट्रभर विस्तार..
शेतीमध्ये प्रयोग करत असतानाच वाईमध्ये नर्सरी सुरू केली. रस्त्यावर उभे राहून रोपांची विक्री ते करत होते. आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते नारळ, आले, सुपारी, आंबे यांचे संकरित रोपे पुरवत आहेत. प्रत्येक झाडाला बारकोडींग आहे. या बारकोडींगमध्ये मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर झाडाची जात आणि रोपाविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध होते.
- सागर गुजर
फोटो आहेत...