शिराळा : शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली असून, ११0 मि.मी पाऊस पडला आहे. चांदोली धरण ८४ टक्के भरले असून, धरणात २८.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शिराळा तालुक्यात सर्व मंडल क्षेत्रात गेले दोन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील वारणा-मोरणा नदीच्या पाण्यात वाढ झाली असून, वारणा नदीकाठची पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात गेले आठ दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस, ज्वारी आदी पिकांच्या आंतरमशागतीची कामे पूर्ण केली. तसेच पिकांवर औषध व टॉनिक फवारणी करण्यात आली होती. या उघडीपीनंतर गेले दोन दिवस पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. तालुक्यात भाताची १३ हजार ८00 हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी वेळेवर पाऊस पडल्याने भात पिकाबरोबरच खरीप हंगामातील सर्व पिके जोमात आहेत. तालुक्यात मोरणा, शिवनी, रेठरे, करमजाई धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ४९ पाझर तलाव तुडुंब झाले आहे. चांदोली धरणामध्ये २८.४७ टीएमसी पाणीसाठा असून ८२.७३ टक्के धरण भरले आहे. धरण पाणी पातळी २0.७0 मीटर असून, एकूण पाणीसाठा ८0६.0१३ द.ल.घ.मी. आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ६११.१७३ द.ल.घ.मी. आहे. (वार्ताहर)
‘चांदोली’त अतिवृष्टी
By admin | Updated: August 3, 2016 00:27 IST