परळी : आमची लढाई ही विचारांची आहे. कोणत्याही व्यक्तींच्या विरोधात नसून भाजपविरोधात आहे. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्याचे काम आम्ही करणारच. राष्ट्रवादीतील प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम आम्ही करीत असतो. ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदेत परळी खोरे हे राष्ट्रवादीमय करणार असल्याचा निर्धार विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भोंदवडे येथील मेळाव्यात केला. यावेळी शशिकांत वाईकर यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कुडाळ गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राजकुमार पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन जाधव, मुंबई राष्ट्रवादी पदाधिकारी श्रीरंग देटे, विष्णू पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, परळी खोऱ्यात अडीच वर्षांनंतर परत येण्याची संधी मिळाली आहे. परळी भागातील मुंबईतील कार्यकर्त्यांची एकी मी पहिली आहे. या परिसरातील तसेच जावळी, सातारा, पाटण तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही अडचण असल्यास ती अडचण सोडवण्यास समर्थ आहे. परळी खोऱ्यात घराघरांत राष्ट्रवादी वाढवायची आहे. जर कोणी त्रास देत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. दिवंगत भाऊसाहेब महाराजांपासून माझे राजघराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला राजकारणात संधी दिली. पण, सध्या राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर आहे.
जि.प. सदस्य दीपक पवार भाषणाच्या सुरुवातीसच म्हणाले, ही गर्दी बघून राजू भोसले घाबरले असतील. पण, परळी भागात बदल झाला पाहिजे याची सुरुवात या मेळाव्याच्या माध्यमातून होत आहे. किती दिवस एकाधिकारशाही स्वीकारत राहणार? परळी भागाचे लोक फक्त म्हणतात तुम्ही लढा आणि घरात बसतात. मात्र आता ते हुशार झाले आहेत. उरमोडी धरणाचे पाणी या भागातील शेतीला नाही. आमदारांनी डोळे झाकले आहेत का ? डोंगर कोणी फोडले? आंबळे धरणाचे काम का रखडवले? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
मेळाव्यात परळी भागातील अनेक गावातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी प्रवेश केला. विष्णू पवार, प्रशांत कुरळे, सचिन जाधव, बच्चू यादव यांची यावेळी भाषणे झाली. राजेंद्र लवघारे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक, केले तर महेश जाधव यांनी आभार मानले.