लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : शिखर शिंगणापूर चैत्र यात्रेपासून श्रावण महिन्यापर्यंत लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणारा शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर परिसर अक्षरशः ओस पडला आहे. जवळपास मागील वर्षी...महिने व या वर्षी तीन महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने व सलग दोन वर्षे वार्षिक यात्रा झाली नसल्याने येथील व्यावसायिक, सेवाधारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही गर्दीचा हंगाम वाया गेल्याने ''उघड दार देवा आता'' असे म्हणण्याची वेळ येथील व्यावसायिक, पुजारी मंडळी व भाविकांवर आली आहे.जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली असून आता मंदिरे कधी उघडणार याकडे व्यापारी व भाविकांचे डोळे लागले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक सुरु झाला आणि मंदिराची दारे लाॅक झाली. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर या वर्षी ५ एप्रिलपासून बंद आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेली चैत्र महिन्यात होणारी येथील वार्षिक यात्राही सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाल्यामुळे येथील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच चैत्र महिना,उन्हाळी सुट्टी, लग्नसराईत, शंभू महादेव मंदिर बंदच राहिल्याने व्यापारी, व्यावसायिक, सेवाधारी, पुजारी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मंदिर परिसरातील नारळ, बेलफुल, पेढे, प्रसाद, फोटोफ्रेम, खेळणी, हॉटेल यासारखी जवळपास २०० हून अधिक दुकाने तीन महिन्यांपासून बंद असल्याने येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मंदिरावर उदरनिर्वाह असलेले बडवे, जंगम, कोळी, घडशी, गुरव समाजातील जवळपास १०० हून अधिक सेवाधारी मंडळीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शिंगणापूरसह पंचक्रोशीतील अनेक कुटुंबांचे दैनंदिन जनजीवन शिंगणापूर मंदिरावर अवलंबून आहे. हातावर असलेल्या पैशावर गुजराण करत लोकांनी अनेक महिने कसेतरी काढले, त्यामुळे येथील व्यावसायिक, सेवाधारी, पुजारी यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर काही प्रमाणात आले असल्याने सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली असून बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. आता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरे कधी उघडणार याकडे व्यापारी व भाविकांचे डोळे लागले आहेत.
चौकट- आता जगायचं कसं.....
शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी चैत्र यात्रेपासून श्रावण महिन्यापर्यंत भाविकांची गर्दी असते. चैत्रयात्रा, उन्हाळी सुट्टी, ग्रामीण यात्रा, लग्नसराई, आषाढीवारी व श्रावण महिना अशी सलग चार महिने भाविकांची वर्दळ असल्याने येथील व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद असल्याने या वर्षी उत्पनाचा मुख्य सिझन वाया गेल्याने यापुढे ''आता जगायचं कसं,'' असा प्रश्न येथील व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.
दीपकराव बडवे पुजारी शिखर शिंगणापूर माण - २२ मार्च २०२० पासून अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर बंद आहे. या मंदिरावर सर्व सेवाधारी व छोटे मोठे व्यावसायिक मिळून जवळपास २०० कुटुंबांचा चरितार्थ चालतो. त्यांची उपासमार होत असून कोरोनाने मरण्यापेक्षा मंदिर बंदमुळे जगण्याची चिंता पडली आहे. शासनाने त्वरित सर्व मंदिरे पूर्ववत सुरू करावीत अशी मागणी केली आहे.
बाळासाहेब किसन पवार, व्यावसायिक शिखर शिंगणापूर - मंदिर बंद व सर्व यात्रा बंद असल्याने अर्थकारण कोलमडले आहे. माझा भस्म,बेळफुल,प्रसाद विक्रीचा छोटा व्यवसाय आहे. मंदिर बंद असल्याने कर्जाचा डोंगर वाढत असून जीवन जगणे कठीण झाले आहे. शासनाने लवकर मंदिरे सुरु करावीत.
आशाबाई मोहिते, व्यावसायिक शिखर शिंगणापूर - कोरोनाच्या भीतीपेक्षाही रोजी रोटी मिळवण्याची व रोजचे जीवन जगण्याची चिंता आहे . नवरा नाही, पाच मुलींना मला संभाळावे लागत आहे. मंदिर सुरू असल्यावर कष्टकरून, सेवाकरून, व बेळफुल विक्री करून चरितार्थ चालवीत असते शासनाने आमच्या गोरगरिबांसाठी मंदिरे त्वरित खुली करावीत, अन्यथा आर्थिक मदत द्यावी.