सातारा : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर राज्यातील सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला अन् तब्बल सात ते आठ महिने एसटीची सेवा बंद होती. त्याचा एसटीला चांगलाच फटका बसला आहे. आता परिस्थिती सुधारत असून, सध्या ऐंशी टक्के बस फेऱ्या सुरू आहेत, तर उर्वरित वीस टक्के फेऱ्या लवकरच सुरू होतील, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. एसटीच्या सर्वच गाड्या बंद होत्या. त्यानंतर पन्नास टक्के उपस्थितीवर बस धावू लागल्या. मात्र संसर्गाचीच भीती असल्याने प्रवासी घरातून बाहेर पडलेच नाहीत. पण त्यातूनही सावरण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रयोग राबविले जात आहेत. यामध्ये सर्वच आगारातून राज्यातील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत. त्या यापूर्वी कधीही धावत नव्हत्या. त्यामुळे सातारा विभागाला नवीन लाइन मिळाली आहे. तसेच मालवाहतूक विभाग सशक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळेही आणखी सुधारणा होणार आहे.
चौकट :
दुर्गम भागात कमी फेऱ्या
सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम आहे. त्या ठिकाणी लहान लहान गावे, वाड्या-वस्त्या आहेत. तेथील लोकसंख्याही कमी असल्याने एसटीला फारसे उत्पन्न मिळत नाही. पेट्री परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. मात्र चिकणवाडी तसेच वांजळवाडी मार्गे जाणारी धावलीची फेरी अद्याप सुरू झालेली नाही.
कोट १
चिकणवाडी हे गाव दुर्गम भागात असून आजारी रुग्ण तसेच प्रशासकीय कामासाठी ग्रामस्थांना साताऱ्यात यावे लागते. माध्यमिकचे विद्यार्थ्यांना साताऱ्यात यावे लागते; मात्र या मार्गावरील एसटी अद्याप सुरू नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
- गणेश चिकणे, ग्रामस्थ चिकणवाडी
कोट २
कास पठार परिसरातील विविध गावांच्या ग्रामस्थांनी एसटी पुन्हा सुरू करण्याबाबत विभाग नियंत्रक सागर पळसुले यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन आता एसटी पूर्ववत सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी सुरू केल्यास गैरसोय दूर होणार आहे.
- सोमनाथ जाधव, अध्यक्ष कास पठार विकास प्रतिष्ठान
कोट :
शाळा सुरू झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या ग्रामीण भागातून शहरात वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व आगारप्रमुखांना मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
- ज्योती गायकवाड,
विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा
आगारनिहाय गाड्या
आगार पूर्वी आता
सातारा १२९ १०१
कऱ्हाड ८४ ७०
कोरेगाव ५१ ३७
फलटण ८८ ७२
वाई ५६ ४४
पाटण ५२ ४४
दहिवडी ४४ ३७
महाबळेश्वर ४४ ४१
मेढा ५० ४१
खंडाळा ३९ ३१
वडूज ५६ ४९
एकूण ५९३ ६६७