सातारा : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, मागील काही दिवसांत भावात चढ-उतार सुरू आहे. सातारा बाजार समितीत नवीन कांद्याचीही आवक वाढल्याने दर क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांनी ढासळला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात शेतीमाल येतो. तर दर गुरूवार आणि रविवारी मालाची अधिक आवक होते. यामध्ये कांदा, बटाट्याची आवक जादा राहते.
मागील तीन महिन्यापूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडेसहा हजारांपर्यंत पोहोचला होता. तर भाजी मंडई, दुकानात कांद्याची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने होत होती. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळूहळू कमी झाला आहे. बाजार समितीतही दर ढासळला. मात्र, मागील महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर दरात थोडी सुधारणा झाली. कमी जास्त फरकाने दर चांगला मिळत असला तरी चढ-उतार सुरूच आहे.
मागील काही दिवसांत सातारा बाजार समितीत कांद्याला १ हजारापासून ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत होता. पण सध्या बाजार समितीत नवीन कांद्याची आवक वाढत चालली आहे. परिणामी दर कमी होताना दिसून येत आहे. गुरूवारी बाजार समितीत २६५ क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला क्विंटलला हजारापासून २५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील आठवड्याची तुलना करता दरात जवळपास हजार रुपयांचा उतार आला आहे.
सातारा बाजार समितीत गुरूवारी ५९ वाहनांतून ९३४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. आवक चांगली असून अजूनही अनेक भाज्यांना चांगला दर मिळत नसल्याचे समोर आले. गवार आणि शेवग्याचा दर तेजीत निघाला. गवारला १० किलोस ५०० ते ५५० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ५०० ते ६०० रुपये भाव आला. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली. वांग्याला १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ४० ते ५०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ५० ते ८० अन् दोडक्याला २०० ते २५० रुपये दर आला.
बटाट्याला क्विंटलला एक हजारपासून १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला ३ ते ४ हजार रुपये भाव आला. आल्याला १ हजार ते १८०० रुपये दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. २५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
चौकट :
पालेभाज्यांचे दर वाढू लागले...
सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. त्यातच मागील काही दिवसांच्या तुलनेत दरात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी मेथीच्या १५०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ५०० ते ७०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबिरीची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ५०० ते ७०० रुपये मिळाला.