शिरवळ : कंटेनरला कारने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत कारचालक जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अंकुर चंद्रशेखर गजबे ( वय २५, रा. भद्रीपूर, चंद्रमुखी बिल्डिंग, कल्याण मुंबई) असे ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. हा अपघात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील केसुर्डी हद्दीत शुक्रवार, दि. २ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कल्याण, मुंबई येथील चार मित्र गोवा येथे फिरण्यासाठी कार (एमएच ०५ एजे ६०८८)ने निघाले होते. यावेळी कार अंकुर गजबे हा चालवित होता. कार केसुर्डी हद्दीतील एका कंपनीसमोर आली असता महामार्गावरून पुढे निघालेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की कारचालक अंकुर गजबे (वय २५), मितेश ब्रँन पोलमूर्ती (२५), संजीव सर्जेराव पाटील (२७) व श्रीकृष्ण रतिराम शंखवार (२५) हे गंभीर जखमी झाले. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात पहाटे झाल्याने लवकर मदत मिळत नव्हती. पण अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्त मदतीला धावून आले. गंभीर जखमींना शिरवळमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता कारचालक अंकुर गजबे याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताची फिर्याद श्रीकृष्ण शंखवार यांनी दिली आहे. पोलीस हवालदार रमेश वळवी तपास करत आहेत.
कार-कंटेनर अपघातात एक ठार
By admin | Updated: October 2, 2015 23:34 IST