वडूज : खटाव तालुक्यात राजकीय त्रिभाजनातल्या समस्या व विकासाबाबत लोकप्रतिनिधींचा अभाव आणि महत्त्वपूर्ण असलेल्या प्रमुख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा या आढावा बैठकीकडे झालेला कानाडोळा. यामुळे खटाव तालुक्यातील समस्या गंभीर बनल्या आहेत. सभापती प्रभावती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. कदम यांच्यासह पंचायत समिती सदस्य, तालुका वैद्यकीय अधिकारी युन्नूस शेख, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाम कदम, तालुका कृषी अधिकारी कदम उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ. युन्नूस शेख म्हणाले, ‘चार दिवसांपूर्वी डेंग्यूसदृश जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये संशयास्पद रुग्ण काही आढळले नाही. खटाव-माण तालुक्यांत संयुक्त बैठक, प्रांत मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे, तहसीलदार महेश पाटील, सभापती प्रभावती चव्हाण व संबंधित अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रत्येक गावात जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शिक्षण विभागाचे कर्मचारी जनजागृती करून सर्वेक्षण करतील. तसेच कोरडा दिवस पाळणे, सांडपाणी, घनकचराचे विल्हेवाट लावणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात १४, १५ रोजी तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सर्वेक्षणात कोठेही संसर्गजन्य रोग दिसून आले नाहीत. तसेच तालुक्यात ८२ हजार लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाम कदम यांनी दिली.यावेळी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, येरळवाडी मध्यमप्रकल्प, सातारा पाटबंधारे विभाग, गोंदवले बुद्रुक, वडूज आगार व्यवस्थापक, सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका निरीक्षक भूमिलेख, रोपवन अधिकारी, वनक्षेत्रपाल, नायब तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक वडूज, औंध ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक कुटीर रुग्णालय, कलेढोण, वीजवितरण कंपनी, वडूज आदी अधिकारी गैरहजर होते. त्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी सदस्या सोनाली खैरमोडे, उज्ज्वला विधाते, मनीषा सिंहासने, सुलभा शिंदे, रंजना खुडे, भरत जाधव, विश्वनाथ पुजारी, मोहन जाधव आदी उपस्थित होते. उपसभापती धनाजी पावशे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आढावा बैठकीकडे अधिकाऱ्यांच कानाडोळा
By admin | Updated: November 7, 2014 23:39 IST