लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारीही मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. मागील १५ दिवसांत तब्बल ४०० कर्मचारी बाधित झाले आहेत, तर चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत कर्मचारी रुग्णसंख्या १२९४ वर पोहोचली आहे. दरम्यान, बाधितांचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून वर्षाचा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागांतही कोरोनाचा शिरकाव झाला. जुलै महिन्यापासून तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होता. याच काळात जिल्हा परिषदेतही कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागांत कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील अर्थ, शिक्षण, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, आरोग्य आदी विभागांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोनाबाधित होत आहेत.
आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण १२९४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यामधील तब्बल ४०० बाधित हे २५ एप्रिलनंतर स्पष्ट झाले आहेत. एवढ्या वेगाने कर्मचारी बाधित झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सातारा तालुक्यात कार्यरत सर्वाधिक २१९ कर्मचारी बाधित झाले आहेत, तर फलटण तालुका १८०, कोरेगाव १६४, कऱ्हाड १६०, खटाव १२८, खंडाळा ५४, जावळी ३५, पाटण ८९, महाबळेश्वर तालुका ५०, माण ११६ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ९९ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर कोरोना बळींचा आकडा २१ वर पोहोचला आहे. यामधील चौघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू १५ दिवसांत झाला आहे.
कोरोना विषाणूमुळे खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सातारा आणि पाटण तालुक्यातील तिघांचा, तर कोरेगाव, जावळी, फलटण आणि माण तालुक्यातील प्रत्येकी २, तसेच कऱ्हाड आणि महाबळेश्वर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी गेला आहे.
चौकट :
३८१ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू...
जिल्हा परिषदेच्या १२९४ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामधील ८९२ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १३५ जणांचा समावेश आहे, तसेच सातारा तालुक्यातील १६९, पाटण ८३, कऱ्हाड १३५, महाबळेश्वर ४०, खटाव ६८, वाई ७३, फलटण तालुका ६४, खंडाळा ४२, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या २९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३८१ कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
....................................................