पेट्री : जून महिन्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कास पठार परिसर, सह्याद्रीनगर-गाळदेवपर्यंतचा डोंगरमाथ्यावरील पट्टा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील डोंगरमाथ्याच्या संपूर्ण भागात रक्तशोषक जळवांचा सुळसुळाट झाला आहे. पाळीव जनावरे, माणसे यांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरवर्षी जूनचा पाऊस सुरू झाल्यावर दलदलीच्या ठिकाणी जळवा आढळतात. ज्या ठिकाणी पालापाचोळा, गवत कुजलेले असते अशा ठिकाणी यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. मानवी वस्तीपासून दूर असणारी ही जळू मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत आढळत आहे. रानामध्ये चरावयास गेलेल्या जनावरांच्या माध्यमातून ही घरापर्यंत पोहोचत आहेत. अनेक पर्यटकांना जळू लागून रक्तस्रावाला सामोरे जावे लागत आहे.
एक अपृष्ठवंशी बाह्यपरजीवी प्राणी जळूचा समावेश ॲनेलिडा (वलयांकित) संघाच्या हिरुडिनिया वर्गात करण्यात येतो. जगभर यांच्या सुमारे तीनशे जाती आहेत. शरीराची लांबी १ ते २० सेंमी असते आणि ताणल्यावर लांबी वाढते. शरीराच्या पुढच्या टोकाला एक लहान चूषक असून, यात तोंड असते. मागील टोकाला मोठे चूषक असते. काही जळवा मासे, बेडूक, गायी-म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात. काही कुजलेल्या पदार्थांवर जगतात, तर काही परजीवी असतात.
चूषकांचा वापर हालचाल करण्यासाठी आणि ज्याचे रक्त प्यायचे आहे त्याला पकडून ठेवण्यासाठी होतो. जळू त्वचेवर वाय आकाराची चीर करते. जळूच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनीभोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात. या ग्रंथी हिरुडिन स्रवतात. स्रावामुळे जखम झालेली जागा बधिर होते. तेथील रक्तप्रवाह वाढतो आणि रक्त गोठण्याची क्रिया थांबते. जळू एकावेळी तिच्या वजनाच्या तीनपट रक्त शोषून घेते.
चौकट
घ्यावयाची काळजी
कास परिसरात फिरताना जळवा लागण्याचा धोका असून, शक्यतो पायावर जास्त चढतात. ज्या ठिकाणी रक्त पिते त्या ठिकाणी खाज सुटते. खाज होत असल्यास त्या ठिकाणी लगेच पाहा, दुर्लक्ष करू नका. गवतातून फिरून आल्यावर पाय नीट पाहा.
नीट लक्ष दिल्यास जळू चिकटलेली लक्षात येते. पायावर चढल्यास घाबरू नका.
कागद वगैरे घेऊन पकडून काढून टाका.
रक्त येत असलेल्या ठिकाणी हळद मिळाल्यास लावा. कोरोनामुळे प्रत्येकाच्या जवळ सॅनिटायजर असते. जळूवर सॅनिटायजर मारल्यास तत्काळ चिकटलेली जागा सोडून मरण पावते.
पाऊस जाऊन ऊन कडक पडल्याशिवाय जळवांचा धोका कमी होणार नाही. पावसाला वैतागलेल्या लोकांना या नवीन त्रासाने चांगलेच जेरीस आणले आहे.