वाठार स्टेशन : विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. चालू गाळप हंगामासाठी गतवर्षीएवढेच ६३ लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कारखान्यापुढे राहणार आहे.१ नोव्हेंबर पासून बहुतांशी सर्वच कारखान्यांनी आपआपल्या हंगामाचा शुभारंभ निश्चित केला आहे. हंगामपूर्व तयारीमध्ये कृष्णा, अजिंक्य, किसन वीर, प्रतापगड, बाळासाहेब देसाई, न्यू फलटण साखरवाडी यांनी बॉयलर अग्निप्रदीपन करीत तोडणी यंत्रणेसाठी आपली यंत्रणा मार्गस्थ केली आहे.विधानसभेच्या निवडणुका तसेच निवडणुकानंतर लगेचच दिवाळीचा सण आल्याने हा सण करूनच आता तोडणी यंत्रणा जिल्ह्यातील तोडणी कामासाठी हजर राहील, अशी परिस्थिती आहे.एका बाजूने कारखाने गाळप हंगामासाठी आक्रमक असले तरी अद्याप गतवर्षीच्या जाहीर दरापैकी दुसरा हप्ताच न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याचीच वेळ आली आहे. चालू हंगामातील दराबाबत भूमिकाच निश्चित नसल्याने ऊस दरासाठी पुन्हा हा हंगाम विस्कळीत होणार, हे निश्चित मानले जाते. गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातच ऊस आंदोलनाचे केंद्रस्थान बनवले असले तरी साताऱ्यातील हे ऊस आंदोलन फोल ठरल्याने चालू हंगामात शेतकरी संघटना कोणते पाऊल उचलणार, आंदोलन कोणत्या पध्दतीने होणार हे स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतच जाहीर होणार असल्याने या परिषदेने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.केंद्राने चालू हंगामासाठी एफ. आर. पी. निश्चित केली असून गतवर्षीपेक्षा शंभर रुपयांनी एफ. आर. पी. वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ९.५० साखर उताऱ्यासाठी २१०० रुपये एफ. आर. पी. होती. मात्र, आता ९.५० साखर उताऱ्याला २२०० रुपये जाहीर केले आहेत. जिल्ह्यात ११.५० ते १२ साखर उतारा ग्राह्य धरल्यास २,६६४ ते २,७०० रुपयांपर्यंत एफ. आर. पी. निश्चित होणार आहे. यातून तोडणी वाहतूक वजा केल्यास २४०० ते २५०० हाच दर निश्चित होईल, अशी परिस्थिती आहे.कारखानदारांतील इतर उपप्रकल्पांची गोळा बेरीज केल्यास चालू हंगामात २७०० ते २८०० ऊस दर जाहीर होण्याबाबत अडचण राहणार नाही. (वार्ताहर)ऊस दराबाबत मार्ग निघणार का ?प्रतिवर्षी केवळ अडवणू करीत चिघळणाऱ्या ऊस दर अंदोलनापूर्वीच आता कारखानदार शेतकरी संघटना, प्रतिनिधींनी एकत्रितपणे मार्ग काढून चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. गतवर्षीही गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासूनच कार्यरत झाला असल्यामुळे यावर्षीही याच दरम्यान जिल्ह्यातील कारखाने यशस्वी गाळप सुरू करतील, अशी शक्यता आहे.
उसाच्या फडात आता राजकीय आखाडा !
By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST