चाफळ : पाटण तालुक्यातील गमेवाडी येथील ग्रामपंचायतीने बसवलेल्या सौरऊर्जा दिव्याची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या बॉक्सला कुलुप लावले नसल्याने चोरट्यांनी डाव साधला असावा, अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. चाफळपासून सुमारे एक किलोमीटर इतक्या अंतरावर गमेवाडी हे गाव आहे. गमेवाडी ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालणारे तीन संच देण्यात आले होते. हे तीन संच कार्यान्वित करीत असताना त्याच्याबरोबर तीन बॅटरीज देण्यात आल्या होत्या. सौरउर्जेमुळे गावात रात्रीच्या वेळी अखंड प्रकाश मिळणार व भुरट्या चोऱ्यांना आळा बसणार म्हणून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु, अवघ्या सहा महिन्यांतच ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समाधानावर पाणी पडल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सौरउर्जा पॅनेलच्या बॅटरी बॉक्सला साधे कुलुप लावून शासकीय मालमत्तेचे जतन करण्याचे भानही ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना राहिले नाही. याचा त्रास ग्रामस्थांना पुन्हा होऊ लागला आहे. सौरउर्जा पॅनेलच्या बॉक्सला कुलूप लावण्यासंदर्भात गमेवाडीतील ग्रामसेवकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या शिपायाजवळ चार महिन्यांपूर्वीच कुलूपासाठी पैसे दिल्याचे सांगण्यात आले. बॅटरी चोरीमुळे ग्रामपंचायतीला सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याने या बेजबाबदारपणास कारणीभूत कोण? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारु लागले आहेत. (वार्ताहर)
आता चोरट्यांचा डोळा सौरऊर्जेवरही
By admin | Updated: June 30, 2014 23:56 IST