राजीव मुळ्ये -- सातारा -रंग बदलणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरड्याने आपलं नावही बदललं असं कुणी म्हटल्यास धक्का बसेल; पण हे खरं आहे. वर्षानुवर्षे एकाच कुळात समाविष्ट असलेले पाच सरडे वेगळ्याच कुळातले असल्याचं चार तरुण संशोधकांनी जगाला दाखवून दिलंय. यातील तिघे मराठी तरुण असून, एक सातारकर आहे. नाव बदललेल्या सरड्यांमध्येही एक ‘प्रदेशनिष्ठ सातारकर’ असून, जीवशास्त्रीय नावात ‘सरडा’ हा अस्सल मराठी शब्द आल्याने मराठीची मानही उंचावली आहे.गळ्याखालील रंगीत पंख्यामुळे आकर्षून घेणारे सर्वच सरडे पूर्वीपासून ‘सिटाना पॉन्टिसेरियाना’ या एकाच कुळात समाविष्ट करण्यात आले होते. या पंखेवाल्याला ‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’ या सामान्य नावानं लोक ओळखतात. तथापि, सरड्यांच्या अनेक प्रजाती या कुळातल्या नाहीत, या गृहितकावरच तरुणांनी संशोधन सुरू केलं. यात वरद गिरी (कोल्हापूर), आमोद झांबरे (पुणे) आणि हर्षद भोसले (सातारा) या मराठी तरुणांचा समावेश असून, दीपक वीरप्पन हा दाक्षिणात्य दोस्त आहे.गळ्याखाली पंखा असलेले काही सरडे ‘सिटाना’ कुळाच्या बाहेरचे आहेत, हे दाखवून देण्यासाठी हर्षदने तीन वर्षे चाळकेवाडीच्या पठारावर अभ्यास केला. निष्कर्षाच्या जवळपास पोहोचल्यानंतर तरुणांनी पुणे जिल्ह्यातील बापदेव घाट, सासवड, सातारा, कोल्हापूर आणि बेळगावमधून सरड्यांचे काही नमुने एकत्र करून बेंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स’मध्ये सादर केले. संस्थेच्या ‘सेन्टर फॉर इकॉलॉजिकल स्टडीज’ विभागात हे चौघे काम करतात. तिथं सरड्यांचे मोजमाप अन बाह्यरूपाची ‘मॉर्फोलॉजी’ तपासणी आणि ‘डीएनए’ विश्लेषणही करण्यात आलं, तेव्हा ते ‘सिटाना’ कुळातील नसल्याचं स्पष्ट झालं. गळ्याखालील पंख्याला रंग नसलेला खरा ‘सिटाना’ असून, रंगबिरंगी पंख्याचे सरडे अन्य कुळातील आहेत हे सिद्ध झालं. आंतरराष्ट्रीय नियतकालिकानं हे संशोधन प्रसिद्ध केलंय. छायाचित्रे सातारचे डॉ. जितेंद्र कात्रे यांनी काढलेली आहेत. अशी असते कुळाची उतरंडप्रत्येक जीव कोणत्यातरी कुळातला (फॅमिली) असतो. त्या कुळात अनेक कुटुंबे (जीनस) असतात. कुटुंबात अनेक प्रजाती (स्पेशी) आणि प्रत्येक प्रजातीत अनेक पोटप्रजाती (सबस्पेशीज) असतात. सरड्यांविषयीच्या नव्या संशोधनात पाच सरडे ‘सिटाना पॉन्टिसेरियाना’ या प्रजातीतून वजा झाले आहेत. त्यातील दोघांचं तर कुटुंबच वेगळं असल्याचं आता स्पष्ट झालंय. असं झालं बारसंमराठीत ‘सरडा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्याच्या प्राणिशास्त्रीय नावातही हाच शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. हे प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळणारे सुंदर सरडे असल्यामुळं ‘सरडा सुपर्बा’ आणि ‘सरडा डार्विनी’ अशी त्यांची प्राणिशास्त्रीय नावे निश्चित झाली आहेत. यातील ‘सुपर्बा’ आतापर्यंत केवळ सातारा परिसरातच आढळला आहे. ‘डार्विनी’ हे नाव उत्क्रांतिवादाचे जनक चार्लस डार्विन यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून देण्यात आलंय.‘फर्ग्युसन’चा नूरच बदललाहर्षद भोसले या सातारच्या तरुण संशोधकाने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पर्यावरणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मध्यंतरी एका वर्षात त्याला अपयश आल्यामुळं त्याच्या हातून फार काही घडणार नाही, असं प्राध्यापक मंडळी मानत असत. या संशोधनानंतर हर्षदच्या अभिनंदनाचं पोस्टर त्याच ‘फर्ग्युसन’मध्ये झळकलंय. त्याने आतापर्यंत बारा नव्या प्रजातींचा शोध लावला असून, त्यात कोळी, सरडे आणि पालींचा समावेश आहे. येथील ‘रानवाटा’ संस्थेचा तो सदस्य आहे.
रंगच नव्हे; नावही बदलतो सरडा!
By admin | Updated: March 11, 2016 23:19 IST