सातारा : हॉर्न न वाजविता वाहन चालविल्यास चालविणाऱ्याची मानसिक शांती, सहनशक्ती वाढण्याबरोबरच ताणतणाव कमी होण्यास मदत होते. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून, ‘नो हॉर्न हीच रस्ता सुरक्षा’ असा संदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी आज (गुरुवार) दिला.२६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंडळ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथील सार्वजनिक बांधकाम यांत्रिकी उपविभागामध्ये बांधकाम विभागाच्या वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर, सुरक्षित वाहन चालविण्याबाबत कार्यशाळा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. एस. देशपांडे, कार्यकारी अभियंता शरद राजभोज, शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण, यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता दिलीप कोळी आदी यावेळी उपस्थित होते.‘सुरक्षा फक्त घोषणा नव्हे तर ती जीवनशैली आहे’ हे यंदाच्या रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य प्रत्येकाने अंगीकारण्याची गरज असल्याचे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण, पोलीस मित्र मधुकर शेंबडे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यकारी अभियंता राजभोज यांनी प्रास्ताविक केले. दिलीप कोळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)वाहनांना रिफ्लेक्टर्स... नेत्रतपासणीहीयानंतर वाहनांना मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्टर्स लावण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये बांधकाम विभागाच्या ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शिल्पा मोरे व त्यांच्या पथकाने रक्तदान शिबिर आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. खोत व त्यांच्या पथकाने ५८ वाहनचालकांची नेत्र तपासणी केली.
‘नो हॉर्न’ हीच रस्ता सुरक्षा
By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST