शाळेत जाण्यापूर्वी मुलांचा हट्ट; मास्कसाठी आग्रही
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होऊन बारा दिवस उलटले आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विद्यार्थी शाळेत जाताना मास्क, सॅनिटायझर आवर्जून नेत आहेत. त्यासाठी मास्क, सॅनिटायझरसाठी ते आग्रही आहेत. एक वेळ चॉकलेट नको, पण मला सॅनिटायझर, मास्क हवा, असा हट्ट मुले-मुली आपल्या पालकांकडे करत आहेत.
शासनाच्या आदेशानुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गन, सॅनिटायझर स्टँड, हात धुण्याची सुविधा आदी व्यवस्था शिक्षण संस्थांनी शाळांमध्ये केल्या आहेत. मात्र, वैयक्तिक सुरक्षा, खबरदारी म्हणून विद्यार्थीही मास्क, सॅनिटायझर आपल्या बॅगेमध्ये घेऊनच शाळेत येत आहेत. वर्गात रोज होणाऱ्या विषयनिहाय तासांची पुस्तके, वह्यांबरोबर सॅनिटायझरची बाटली, मास्क घेतला आहे का, हे तपासून मगच विद्यार्थी शाळेसाठी घरातून बाहेर पडत आहेत. ही दक्षता त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
विद्यार्थी म्हणतात...
मी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी आवर्जून शाळेच्या बॅगेतून रोज ते घेऊन जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची भीती वाटत नाही.
- तपस्या आगवणे, विलासपूर
आपल्या सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटायझर आवश्यक आहे. माझ्या बॅगेत एक जादा मास्क नेहमी ठेवते. आठवीच्या वर्गातील एका मैत्रिणीचा मास्क पाण्यात पडून ओला झाला. त्यावर तिला मी माझ्याकडील मास्क दिला. काही जण सॅनिटायझर विसरून येतात. त्यांना माझ्याकडील सॅनिटायझर देते.
- स्वरा अभिनंदन शीतल मोरे, गुरुवार पेठ
इयत्ता सहावीचा मी विद्यार्थी आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे मी आवर्जून पालन करतो. शाळेसाठी घरातून बाहेर पडण्याआधी माझ्या बॅगेत मास्क, सॅनिटायझर असल्याची खात्री करतो. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यादृष्टीने दक्षता घेतली पाहिजे.
- आर्यन अग्रवाल, शाहूपुरी
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा : १२४७
सुरू असलेल्या शाळा : १२४७
विद्यार्थ्यांची उपस्थिती : ४,११,१०७
शिक्षकांची उपस्थिती : ११३९८
चौकट :
निवासी शाळेत ३१ विद्यार्थी बाधित
शाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झालेला नाही. मात्र, एकंबे पंचक्रोशीतील निवासी शाळेतील तब्बल ३१ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले. गत सप्ताहात साताऱ्यानजीक एका कार्यक्रमासाठी या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर नेण्यात आले होते. तेथे काही रुग्णांच्या संपर्कात हे विद्यार्थी आले असावेत, अशी शक्यता आरोग्य यंत्रणा व्यक्त करत आहे.