खंडाळ्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या नीरा देवघर कालव्यात सध्या काटेरी झाडाझुडपांची वाढ झाली आहे. त्यामुळे कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. याशिवाय कालव्याच्या बाजूने असणारा रस्ताही झुडपांमुळे बंद झाल्याने शेतीमालाच्या वाहतुकीची अडचण होत आहे. यासाठी कालव्यातील पात्रात आणि बाजूने वाढलेली असंख्य झाडे-झुडपे पाटबंधारे विभागाने काढावीत, अशी मागणी होत आहे.
चौकट
पाणी प्रवाह सुरळीत करा : भोसले
नीरा देवघर कालव्यात वाढलेली काटेरी झुडपे पाणी प्रवाहास अडथळा ठरत आहेत. झुडपांची मुळे खोल वाढल्याने कालव्याच्या पाण्याची गळतीही होत आहे. त्यामुळे आवर्तन नियमाने सुटले तरी सर्व गावांना समान पातळीवर पाणी पोहोचत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने झुडपे काढून पाणीप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी शिवाजीनगरचे सरपंच हर्षवर्धन भोसले यांनी केली आहे.